नागपूर – सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न 15 डिसेंबरपर्यंत मार्गी लावू असा आश्वासन रविकांत तुपकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिला होता. मात्र, हिवाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची अमलबजावणी होईल अशी अपेक्षा असताना 15 डिसेंबर उलटून देखील शेतकऱ्यांच्या बाजूने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी सुरू झाली नसल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यामुळे नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनावर रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांना घेऊन 19 डिसेंबर रोजी हल्लाबोल आंदोलन करणार आहेत. मागील आंदोलनावेळी दिलेले आश्वासन सरकारने पाळले नसल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे. त्यामुळे उद्या नागपूर येथील विधानभवनावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल मोर्चा पाहायला मिळणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हजारो शेतकऱ्यांना घेऊन नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.
