तुलसियानी ग्रुपने केलेल्या फसवणूक प्रकरणात आता गौरी खानवर कारवाई होण्याची शक्यता
मुंबई- लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान सध्या अडचणीत आली आहे. गौरीला इडीकडून समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे. गुंतवणूकदार आणि बँकांना ३० कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी ग्रुपच्या घोटाळ्यामध्ये गौरी खानचे नाव आले आहे. या घोटाळा प्रकरणात गौरी खानविरोधात देखील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. याप्रकरणी गौरीची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच तिला इडी नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावणार आहे.
ईडीकडून सध्या तुलसियानी ग्रुपच्या या घोटाळा प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौरी खानला नोटीस बजावण्यासाठी ईडी मुख्यालयाकडून परवानगी घेण्याची तयारी सुरू आहे. तुलसियानी ग्रुपच्या घोटाळ्यामध्ये गौरी खानचे नाव येण्यामागचे कारण म्हणजे या ग्रुपने गौरी कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर होती. तुलसियानी ग्रुपवर फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात गौरी खानचेही नाव घेण्यात आले होते. गौरीचे नाव आल्यामुळे याप्रकरणी ईडी तिची देखील चौकशी करू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. गौरी खानला ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यासाठी तुलसियानी ग्रुपने किती पैसे दिले होते? आणि त्यासाठी काही करार झाला होता का? याची चौकशी होणार आहे.