मुंबई ~
खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानासमोर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा अशी विनंती याचिका राणा दाम्पत्याने न्यायालयात दाखल केली होती. सरकारी पक्ष व राणा दाम्पत्याच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने राणा यांची विनंती याचिका फेटाळली आहे . त्यामुळे आता राणा दाम्पत्य यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मुंबईतील ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी गेलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा रद्द करण्याची मागणी राणा दांम्पत्याकडून न्यायालयात करण्यात आली होती मात्र न्यायालयाने हि विनंती फेटाळली आहे.
राणा दाम्पत्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करीत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी मुंबईच्या खार पोलिस स्टेशन मध्ये एप्रिल 2022 मध्ये राणा दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोबतच राणा दाम्पत्याला अटकही करण्यात आली होती.त्यासाठी सुमारे 14 दिवस राणा दांम्पत्याला तुरुंगात राहावं लागले होते. पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याच्या कारणावरून राणा दाम्पत्यांनी मुंबईच्या सत्र न्यायालयात धाव घेतली होती. एफआयआर दाखल करण्यापूर्वीच आपल्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे नमूद करीत राणा दाम्पत्याने गुन्हाच रद्द करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी त्यांचा निकाल राखून ठेवला होता. आता न्यायालयाने हा निकाल दिलाय . राणा यांच्या विरोधात दाखल असलेला गुन्हा रद्द करता येऊ शकत नाही, असे न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केलंय. यापुढील सुनावणीसाठी राणा दाम्पत्याला आता कोर्टापुढे हजर राहावे लागणार आहे. राणा यांनी ‘मातोश्री’बाहेर केलेल्या आंदोलनाची दोषारोप निश्चितीही आता करण्यात येणार आहे. आरोपांच्या निश्चितीची प्रक्रिया 5 जानेवारी 2024 रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.